Lokshahi Explainer: #BoycottMaldives हा ट्रेंड नेमका आहे तरी काय?
Boycott Maldives Trend : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर मालदीवच्या सरकारमधील झाहिद रमीझ आणि मरियम शिउना यांनी मोदींवर वादग्रस्त टीका केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर बायकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
लक्षद्वीपचे नैसर्गिक सौंदर्य पाहून पंतप्रधान मोदींनी सर्वांना लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केले. यावर मालदीवच्या सरकारमधील झाहिद रमीझ यांनी ट्विट करत म्हटले की, भारतासारखा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे. ही खेदाची बाब आहे. यावरचं न थांबता त्यांनी आणखी एक ट्वीट करत म्हणाले की, लक्षद्वीपचे पर्यटन तुम्हाला वाढवायचे हे मान्य. पण ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही ज्या प्रकारे सेवा पुरवितो, त्या प्रकारची सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये एक प्रकारचा वास येतो, त्याचे काय करणार? असं ट्वीट करत त्यांनी प्रश्न उपस्थित केलं होते.
तर, मरियम शिउना यांनी मोदींना विदूषक आणि ‘इस्रायलची कठपुतली’म्हटलं होतं. यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. भारतीय इंटरनेटवर #BoycottMaldives ट्रेंड सुरू झाला, तेव्हा हजारो लोकांनी मालदीवचे हॉटेल आणि फ्लाइट बुकिंग रद्द केले आणि भारतीय पर्यटनाकडे जाण्याचे निवडल्याने मालदीवला लाखोंचे नुकसान झाले आहे. यातचं अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील हॅशटॅग #boycottmaldive सोबतच #expolreindianisland ट्वीट करत संताप व्यक्त केला. त्यानंतर मालदीव सरकारने ज्या मंत्र्यानी मोदी व भारताविरोधात टीका केली होती त्यांना निलंबत केले आहे.