Ramesh Chennithala At Matoshree | काँग्रेस-शिवसेना वादावर निवाडा होणार का?
महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोलेंच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीत तणावाची स्थितीती निर्माण झाली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. चर्चेतून वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चेन्नीथला करणार आहेत. दरम्यान वादावर तोडगा काढण्यात चेन्नीथला यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावे लागत नसेल. पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे. आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत. आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते. तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते. कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपाच्या चर्चेसाठी उपस्थित असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याची चर्चा आज दिवसभर रंगली होती. या चर्चेवर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कुणीही अशी भूमिका मांडलेली नसताना माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत, असे ते म्हणाले. आमच्यात उत्तम समन्वय आहे. पण भाजपात मारामाऱ्या सुरू आहेत. त्याच्या बातम्या का केल्या जात नाहीत? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर आता काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आज 'मातोश्री'वर येणार असल्याने काँग्रेस-शिवसेना वादावर निवाडा होणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.