Marathwada Rain Update : मराठवाड्यासाठी 3 दिवस अत्यंत महत्वाचे; 'या' तारखांना जोरदार पाऊस बरसणार
थोडक्यात
मराठवाड्यासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र राज्यातील पावसाचे प्रमाण वाढवणार
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
( Marathwada Rain Update ) मराठवाड्यासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र राज्यातील पावसाचे प्रमाण वाढवणार आहे. त्याचा थेट परिणाम मराठवाड्यावर होऊन पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे.
आतापर्यंत मराठवाड्यात 746 मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल 24 टक्के जास्त आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक भागांत खरीप पिके ओलसर परिस्थितीमुळे धोक्यात आली आहेत. हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नद्या-नाल्याच्या काठावर न जाण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.
अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.