मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूणमध्ये; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
राज्यातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली. दरम्यान, पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
सलग तीन दिवस थैमान घातलेल्या पावसानं राज्यात आता उसंत घेतल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला असला, तरी कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं, तरी आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. रायगडमध्येही भूस्खलन झालेल्या ठिकाणी पाऊसाने विश्रांती घेतल्यानं मदतकार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुरग्रस्त भागातील परिस्थिती संथगतीने पूर्वपदावर येताना दिसत असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
तिन्ही नेते पुरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. दहा वाजेच्या सुमारास तिन्ही नेते कोकणाच्या दिशेने रवाना झाले. नारायण राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत", असं राणे यांनी म्हटलं आहे.