शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे. कणकवली कोर्टाकडून पोलीस कोठडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
नितेश राणे यांनी या अगोदर हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. तसेच, ते न्यायालयासमोर शरण देखील आले होते. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. मी आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे." असं नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितलं. यानंतर ते कोर्टाच्या दिशेने रवाना देखील झाले.
नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे". हायकोर्टाने देखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे, असं सांगितलं होतं.