( Farmers ) राज्यातील शेतकरी बांधवांना फळ पीक विमा योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या योजनेत द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी आदी फळपिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येत आहे. राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत.
या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही अर्ज केले नाहीत, त्यांनी या मुदतीच्या आत अर्ज सादर करावा."
शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून हवामानातील बदल, अतिवृष्टी, गारपीट, कोरडा दुष्काळ अशा संकटांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारचे सकारात्मक पाऊल आहे.