काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीचा बलात्कारानंतर खून करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. नागरिकांमध्ये त्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. यातच आता या आरोपीचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजू याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नक्की काय आहे प्रकरण ?
9 सप्टेंबर रोजी आरोपी राजूने एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली होती. घटनेनंतर आरोपी फरार होता. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. प्रत्येकजण आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत होते. इतकच काय तर, तेलंगाणा सरकारमधील एका मंत्र्यानं 'नराधमाला पकडून थेट एनकाउंटर करू', अस वक्तव्यही केलं होतं. यातच आता आरोपीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. सूचना मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय.
आरोपीने ट्रेनसमोर मारली उडी
'आरोपीचा मृत्यू झाल्याची बातमी खरी आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून या संदर्भात अधिक माहिती घ्यावी लागेल. मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपीचा पाठलाग करत होते आणि त्याला शरण येण्याचा इशारा देत होते. पण, आरोपीने पोलिसांचे ऐकले नाही आणि ट्रेनसमोर उडी मारली.' अशी माहिती
हैदराबाद पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश यांनी माध्यमांना दिली.