नाशिक जिल्ह्यातील भिलमाळ आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव यांनी जगातील 7 उंच पर्वाता पैकी एक असलेल्या माउंट किलीमांजारोवर भारतीय ध्वज फडकवला आहे. विशेष म्हणजे उणे 10 ते 15 तापमान त्यांनी शिखर सर करत तिरंगा फडकवला. यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी अशी कामगिरी करणाऱ्या त्या महाराष्ट्रतील नव्हे तर भारतातील एकमेव महिला ठरल्या आहेत.
देशासाठी यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच निमित्ताने अमृता यांनी दक्षिण आफ्रिका खंडातील टांझानिया स्थित माउंट किलीमांजारो सर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे,आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, उपायुक्त अविनाश चव्हाण, आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, नाशिकचे प्रकल्प अधिकारी विकास मीना आणि मुख्याध्यापक अहिरे यांच्या शुभेच्छा घेऊन किलिमांजारो सर करण्यास त्यांनी सुरुवात केली.
किलिमांजारो हा जगातील 7 उंच पर्वातापैकी 5 क्रमांकाचा असून त्याची उंची 19340 फूट अर्थात 5484 मीटर आहे. या इतक्या उंच शिखरावर चढाईसाठी त्यांनी 360 एक्सप्लोररचे सीईओ आनंद बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम आखली होती. या मोहिमेसाठी त्या एकट्याच परदेशात गेल्या होत्या. 26 तारखेला किलिमांजारोच्या उहूरू पिक वर ध्वज फडकविण्यासाठी त्यांनी दिनांक 25 रोजी 11 वाजता उणे 10 ते 15 तापमान असताना चढण्यास सुरुवात केली. आणि शिखरांच्या शेवटी पोहोचत भारताचा ध्वज फडकवला. दरम्यान किलिमांजारोवर ध्वजारोहन केल्यानंतर त्यांनी सर्व महिलांना सकारात्मकतेने जगण्याचा संदेश दिला.
दरम्यान ह्या यंदाच्या 26 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी हे शिखर सर करणाऱ्या अमृता भालेराव या महाराष्ट्रतील नव्हे तर भारतातील एकमेव महिला ठरल्या आहेत. तसेच अशी कामगिरी करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील त्या पहिल्या कर्मचारी तसेच शिक्षकही आहेत.