आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवड समितीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत भाजपा आसाममध्ये एकण ९२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय झाला.
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सहयोगी पक्ष आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. यानुसार, एजीपी विधानसभेच्या २६ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. तर यूपीपीओ ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, उर्वरित ९२ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत.
दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात आयोजित केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, बीएल संतोष, राजनाथ सिंह, कैलाश विजयवर्गीय, थावरचंद गहलोत, शाहनवाज हुसेन, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.
विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार
आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. राज्यात २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ मार्च आहे.