शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून थेट सक्तवसुली संचलनालयाला (ED)आव्हान दिले आहे. आज सकाळपासूनच संजय राऊत यांनी ईडीवर टाकलेल्या या लेटरबॉम्बची प्रचंड चर्चा रंगली आहे. अशातच "आम्ही जर तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना माहितीये मी काय बोलतोय ते", असं राऊत म्हणाले आहेत. त्यावरून आता भाजपाकडून आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
"अहो राऊत, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना असल्या बायकी धमक्या देण्यापेक्षा ईडीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवा. तुम्ही केलंय, ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे. थयथयाट करून काय उपयोग?" असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
"राऊतसाहेब, तुम्ही काळजी करू नका"
"राऊत साहेब, तुम्ही काळजी करू नका. ईडी तुमची चौकशी कायद्यानेच करेल. आपण तथाकथित बोगस डिग्रीच्या नावाखाली एका महिलेला ४७ दिवस तुरुंगात पाठवलंत. किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यानंतर सामनामध्ये त्यांच्या व्यंगाविषयी उल्लेख केलात. त्यामुळे आता तुम्हाला लोकशाही आठवली, तरी कायदा आपलं काम करेल हे त्यांनी लक्षात ठेवावं. तुम्ही कर नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. कायद्याला सामोरं जा. अशी भाषा तुम्ही करतच होतात. ती करा. तुमच्यावरच्या कारवाईमुळे महाभकासआघाडी सरकार पडेल वगैरे असल्या भ्रमात राहू नका. तो आमचा हेतू कधीही नव्हता, नाहीये आणि असणारही नाही", असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते संजय राऊत?
"तुम्ही पाहत राहा आता काय होणार आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही," असे संजय राऊत म्हणाले आहेत.