ब्राझीलमध्ये नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्यानं जगभरात मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ब्राझीलमध्ये कोरोना मृतांची संख्या 5 लाखांवर गेलीय. यामुळे विरोधक आणि स्थानिकांनी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो यांना देशातील कोरोना रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केलाय तर त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोरोनाबाधित मृतांची आकडेवारी वाढल्याचाही ठपका सत्ताधारी जेर बोलसोनारो यांच्या सरकारवर विरोधकांनी ठेवलाय. ब्राझीलमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यानं आणि कोरोनासाठी चुकीच्या उपचारपद्धतीला दिलेल्या प्रोत्साहनामुळे कोरोना मृतांची संख्या वाढल्याचा आरोप टिकाकार करतायेत. रिओ दि जानेरोमध्ये नागरिक रस्त्यावर उतरुन सरकारच्या कामाचा निषेध करतायेत तर विरोधक आकाशामध्ये लाल फुगे सोडून कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहतायेत. ब्राझीलमध्ये सरकारविरोधात आंदोलन होत असले तरी नागरिक आणि आंदोलक कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसतायेत.यामुळे ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.