टेक क्षेत्रात चर्चेत असलेला Google Pixel 10a स्मार्टफोन १८ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे. Googleकडून मध्यम किंमत श्रेणीत सादर होणाऱ्या या फोनबाबत लाँचपूर्वीच अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी कंपनीने आकर्षक डिझाइनपेक्षा दमदार हार्डवेअर, मोठी बॅटरी आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट यावर भर दिल्याचे दिसते.
युरोपमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे €499 (अंदाजे 53,600 रुपये) असू शकते. विशेष ऑफरअंतर्गत 256GB व्हेरिएंटही सुरुवातीला याच किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऑब्सीडियन, फॉग, लॅव्हेंडर आणि बेरी असे चार रंग पर्याय उपलब्ध राहतील.
फोनमध्ये 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2424x1080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळेल. Tensor G4 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्युरिटी चिपमुळे परफॉर्मन्स व सुरक्षितता अधिक मजबूत होईल. 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजचे पर्याय दिले जातील.
फोटोग्राफीसाठी 48MP प्रायमरी कॅमेरा (OISसह) आणि 13MP अल्ट्रावाइड लेन्स असे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फीसाठी 13MP कॅमेरा दिला जाईल. 5100mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टही अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन Android 16 सह येण्याची शक्यता असून कंपनी ७ वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देऊ शकते. त्यामुळे मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी हा फोन मोठा पर्याय ठरू शकतो.