थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला.
आता कंपन्यांना नव्या व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर म्हणजेच अंदाजे ८८ लाख रुपये शुल्क द्यावे लागणार
ही फी थेट नियोक्ता कंपन्यांवर लागू होणार असली तरी, त्याचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर होणार अशी भीती व्यक्त केली जात
अमेरिकेत शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. या बदलानुसार, आता कंपन्यांना नव्या व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर म्हणजेच अंदाजे ८८ लाख रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
यापूर्वी हे शुल्क केवळ १५०० डॉलर (सुमारे १.३२ लाख रुपये) होते. मात्र, २१,000 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार ही फी थेट ८८ लाख रुपयांवर गेली आहे.
कंपन्यांवर भार, पण परिणाम विद्यार्थ्यांवरही?
ही फी थेट नियोक्ता कंपन्यांवर लागू होणार असली तरी, त्याचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण, कंपन्यांना एखाद्या परदेशी उमेदवाराला नोकरी देण्यासाठी एवढा मोठा खर्च करणे अवघड जाईल. परिणामी, अनेक कंपन्या परदेशी नागरिकांना नोकरी देणे टाळतील आणि थेट अमेरिकन नागरिकांना रोजगार देण्यास प्राधान्य देतील.
एकदाच द्यावी लागणारी फी
नव्या नियमांनुसार ही ८८ लाख रुपयांची फी केवळ एकदाच भरावी लागणार आहे. म्हणजेच दरवर्षी इतकी रक्कम मोजावी लागणार नाही. तरीदेखील, एवढी मोठी एकरकमी फी भरल्यामुळे कंपन्यांच्या मनात परदेशी विद्यार्थ्यांना नोकरी देण्याबाबत संकोच निर्माण होणार यात शंका नाही.
भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढली
दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जातात. त्यापैकी अनेक जण एच-१बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकरी करून आपले करिअर घडवतात. मात्र, नव्या शुल्कवाढीमुळे कंपन्या भारतीय विद्यार्थ्यांना संधी देण्यापासून मागे हटतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेत एच-१बी व्हिसासाठी झालेली ही प्रचंड शुल्कवाढ केवळ कंपन्यांच्या आर्थिक क्षमतेला आव्हान देणारी नाही, तर भारतीय विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधींसाठीही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.