पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सीबीएसई बोर्डाने एक नवीन शिष्यवृत्ती योजना आमलात आणली आहे. ज्याचा फायदा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी होणार असून त्यांना त्यामुळे स्वतःचे चांगले करिअर घडवता येणार आहे.
आज वाढत चाललेल्या महागाईमुळे आणि वाढत्या शिक्षणशुल्कामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अनेकांना कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. मात्र आता यावर उपाय म्हणून सीबीएसई बोर्डाने एक नवीन शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती म्हणजे एक सुवर्णसंधीच असणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडून ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 20,000 रुपयांपर्यत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) असे या योजनेचे नाव आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना 20,00 रुपये रक्कम यामध्ये दिली जाणार आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 असून scholarships.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याद्वारे त्यांच्या शिक्षणाला मोठी मदत होणार असून त्याद्वारे त्यांना त्यांच्या शिक्षणात अधिक चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.