शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता आज पार पडली आहे. गेल्या आठवडाभरापासून नवरात्र उत्सवाची लगबग अंबाबाई मंदिरात पाहायला मिळते आहे.
आज सकाळपासून अंबाबाई देवीचा सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता अंबाबाई मंदिरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात कडक बंदोबस्तात पार पडली.
यावेळेस 20 पेक्षा अधिक सेवेकऱ्यांनी सर्व दागिन्यांची स्वच्छता करत पॉलिश देखील केलं आहे. यामध्ये अंबाबाईचा सोन्याचा किरीट, चंद्रहार, कवड्याची माळ, सोन्याची पालखीसह अन्य सोन्याच्या दागिन्यांची प्रामुख्याने स्वच्छता करण्यात आली. हे दागिने नवरात्र उत्सव काळात अंबाबाईला परिधान केले जातात.