विकास माने, बीड | लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यास गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आल्याने बीडमध्ये कॉग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत.
प्रियांका गांधी रविवारी (३ ऑक्टोबर) रात्री उशिरा लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेतलं. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर चक्क प्रियांका गांधी या डिटेन्शन रुममध्ये झाडू घेऊन साफसफाई करताना दिसल्या आहेत.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान यावेळी काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाद निर्माण झाला होता.