देशभरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर आहे. परिणामी कोरोनाच्या वाढत्या रुग्णाची संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन घ्यावा लागेल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन मंत्र्यानी देखील दिली आहे.
कोरोना परिस्थितीबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर असे म्हणाल्या की, 'ही चिंतेची बाब आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक मास्क घालत नाहीत. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपण दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशने जाऊ. लॉकडाऊन पुन्हा लागू करावा का नाही हे लोकांच्या हाती आहे. महापौर पुढे म्हणाल्या की, 'मुंबईकरांना हेच सांगणे आहे की आपल्याला लॉकडाऊन नको आहे. पण गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या वाढत आहे. नाईलाजास्तव लॉकडाऊन करावं लागेल अशी भीती राज्यसरकारने व्यक्त केली आहे.'
कोरोना लसीकरणाबाबत बोलताना महापौर म्हणाल्या की, आपल्याकडे अमेरिकेपेक्षाही जास्त लसीकरण झाले आहे. त्या ही लस घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच सर्वांनी लस घेतली पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळीच सोडवण्यात येतील अशीही माहिती पेडणेकर यांनी दिली.