(Donald Trump America ) 2015 मध्ये नेपाळमध्ये जे भूकंपाचे धक्के जाणवले होते त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेपाळी लोकांना अमेरिकेने तात्पुरता संरक्षित स्थिती (TPS)चा दर्जा दिला होता. मात्र हा टीपीएस चा दर्जा आता काढून घेण्यात आल्याचे अमेरिकेकडून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो नेपाळी लोकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे नेपाळी लोकांना अमेरिकेत राहणे आणि काम करणे कठीण होऊ शकते.
टीपीएस सुविधा म्हणजे एखाद्या देशात युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्या समस्यांमध्ये घरी परतणे सुरक्षित नसल्यास, अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. मात्र आता या संदर्भात अमेरिकेच्या प्रशासनाने असा निर्णय घेतला की, नेपाळमधील परिस्थिती आता सुधारली आहे, त्यामुळे लोकांना येथून परत जाणे सुरक्षित आहे. याच पार्शवभूमीवर अमेरिकेने नेपाळला दिलेला टीपीएसचा दर्जा रद्द केला आहे. यावर्षी 24 जूनला टीपीएसची मुदत संपणार आहे. त्यानंतर या टीपीएसच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात येणार नाही आणि टीपीएस लाभार्त्यांना ही मुदत संपल्यानंतर 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे 60 दिवसांच्या कालावधीमध्ये अमेरिकेमधून बाहेर पडावे लागणार अशी माहिती अमेरिकेच्या गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी दिली.
या टीपीएस अंतर्गत लाभार्त्यांना कोणत्याही कायदेशीर अटीशिवाय 18 महिने अमेरिकेमध्ये राहण्याची परवानगी मिळते. सुरुवातीला 24 जून 2015 ला नेपाळ मध्ये विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वाभूमीवर टीपीएससाठी अनुमती दिली गेली होती. अमेरिकेच्या गृह विभागाने 26 ऑक्टोबर 2016 मध्ये ह्याची मुदत वाढवली होती. त्यानंतर ही अनेकवेळेला ह्याचा कालावधी वाढवण्यात आला होता. सुमारे 12700 नेपाळी नागरिकांना हा टीपीएस चा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यापैकी 5000 हून अधिक लोक अमेरिकेचे कायमचे रहिवासी झाले आहेत. मात्र 7000 नेपाळी नागरिकांना अमेरिका सोडावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेपाळी लोकांना आता त्यांच्या देशात परत जावे लागणार आहे.