एअर इंडियामधील क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगमधील त्रुटी गांभीर्याने घेत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व संबंधित जबाबदाऱ्यांवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही अधिकारी ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे आणि आता त्यांना कोणत्याही क्रू व्यवस्थापन कामापासून दूर ठेवले जाईल.
DGCA एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि त्यांच्या प्रगतीचा आणि निकालाचा अहवाल 10 दिवसांच्या आत एजन्सीला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.
भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून DGCAने एअर इंडियाला त्यांच्या वेळापत्रक प्रक्रिया सुधारण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे उड्डाण सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.