(Air India) एअर इंडियाच्या विमानांमध्ये सातत्याने येणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच अहमदाबाद-लंडन मार्गावरील भीषण अपघातात 270 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही मंगळवारी उड्डाणासाठी सज्ज असलेल्या एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आणि उड्डाण रद्द करण्यात आलं. याच दिवशी बोईंग ड्रीमलायनर प्रकारातील सहा विमानांसह एकूण सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली, ज्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकले.
अपघातामुळे ड्रीमलायनरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असूनही सरकारकडून ठोस पावले न उचलल्याने प्रवाशांमध्ये संताप वाढला आहे. फ्रँकफर्ट व लंडनहून हैदराबाद आणि चेन्नईकडे येणारी लुफ्थान्सा आणि ब्रिटिश एअरवेजची दोन विमानेही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या मूळ विमानतळांवर परतवण्यात आली.
मंगळवारी रद्द करण्यात आलेल्या सेवांमध्ये AI 915 (दिल्ली-दुबई), AI 153 (दिल्ली-व्हिएन्ना), AI 143 (दिल्ली-पॅरिस), AI 159 (अहमदाबाद-लंडन), AI 133 (बंगळुरू-लंडन) आणि AI 170 (लंडन-अमृतसर) यांचा समावेश आहे.
तसेच, सोमवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते पुन्हा हाँगकाँगला परतवावे लागले. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे येणाऱ्या AI 180 विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे, ते कोलकाता विमानतळावर आणीबाणीच्या स्थितीत उतरवण्यात आले.