(Air India plane crash) 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावतो आणि ते शोधण्याचे काम काल पासून सुरू होते आणि अखेर दोन पैकी एक ब्लॅक बॉक्स तपास पथकाला मिळाला आहे.
आज सकाळी अपघातस्थळी शोध मोहीमेदरम्यान ब्लॅक बॉक्सपैकी एक (फ्लाइट डेटा रेकॉर्डर किंवा कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर) सापडल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या तांत्रिक स्थितीचा तसेच पायलट आणि कंट्रोल रूम यांच्यातील संवादांचा तपशील देईल.
भारतीय विमान अपघात तपास प्राधिकरण (AAIB) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या तपासात यूकेमधील एअर क्रॅश तपास यंत्रणा (AAIB UK), अमेरिका NTSB, बोईंग कंपनी आणि GE एअरोस्पेस यांचाही समावेश आहे. दुसऱ्या ब्लॅक बॉक्सच्या शोधासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
अपघाताची नेमकी कारणे समजून घेण्यासाठी सध्या प्राप्त झालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा निकषांनुसार विश्लेषित केला जाणार आहे. सापडलेला ब्लॅक बॉक्स हा दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तपास अहवालाची प्राथमिक माहिती येत्या काही आठवड्यांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.