(Air India) एअर इंडियाने दिल्ली आणि अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी यांना जोडणारी नॉन-स्टॉप विमानसेवा 1 सप्टेंबर 2025 पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, या मार्गावरची उड्डाणे थांबवण्यामागे ताफ्यातील उपलब्ध विमानांची कमतरता, दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणांवरील ऑपरेशनल अडचणी आणि मार्गातील निर्बंध कारणीभूत आहेत.
एअर इंडियाने स्पष्ट केले की, त्यांच्या 26 बोईंग 787-8 विमानांच्या आतील सुविधा अद्ययावत (रेट्रोफिटिंग) करण्याचे काम सुरू आहे. तसेच पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलावे लागत आहेत, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो आणि खर्च व तांत्रिक अडचणी वाढतात.
सप्टेंबरनंतर या मार्गावर आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना कंपनीकडून थेट संपर्क केला जाईल. त्यांना पर्यायी मार्गावरील उड्डाणे किंवा पूर्ण रकमेची परतफेड यापैकी एक पर्याय दिला जाणार आहे. एअर इंडियाच्या मते, भविष्यात परिस्थिती सुधारल्यानंतर या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याची शक्यता नाकारलेली नाही. सध्या मात्र दिल्ली–वॉशिंग्टन थेट विमानसेवा तात्पुरती बंद राहणार आहे.