पाकिस्तानला (Pakistan) आता पुन्हा मोठा धक्का बसला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढताना पाहायला मिळत असून यातच स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा (Republic of Balochistan) करण्यात आली आहे.
बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वातंत्र झाल्याची घोषणा केली. बलूच आर्मीकडून काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती. आता त्या ठिकाणचे बलूच नेते मीर यार बलूच यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. 'जगाने शांत बसू नये, आम्हाला देश म्हणून मान्यता द्यावी”, असंही मीर यार बलोच यांनी म्हटलं असून भारतासह जगभरातील देशांकडे त्यांनी समर्थनाची मागणी केली आहे.
'आम्ही पाकिस्तानी नागरिक नाही, आम्ही बलुचिस्तानी आहोत. बलूच नागरिकांना पाकिस्तानी म्हणणे बंद करा', असे आवाहन मीर यांनी केलं आहे. मीर यार बलोच हा एक लेखक आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा (Baloch Liberation Army) नेता आहे. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावं अशी मागणी त्याने भारताकडे केली असून तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी अशी मागणीही करण्यात आली आहे.