दिल्ली विधान सभेचे मतदान आज (5 फेब्रुवारी) पार पडलं. या निवडणुकांचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध संस्था आता एक्झिट पोल जाहीर करताना दिसत आहेत. त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार? याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही अंदाज बांधले जात आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज व्यक्त केले आहेत त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया.
दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता असलेली बघायला मिळत आहे. 'आप' पक्षाने आजवर 2013, 2015 व 2020 या वर्षांमध्ये दिल्लीत वर्चस्व मिळवले आहे. मात्र यावेळी भाजपदेखील सत्तेत येणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. मॅट्रीजने समोर आणलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच आपला 32 ते 37 जागा आणि काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे आता पर्यंत अनेकांनी भाजपा पक्ष सत्तेत येण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत. तसेच 'पीपल्स पल्स'नुसार, भाजप 51 ते 60 जागांवर आघाडी मिळवू शकते तर, 'आप'ला 10 ते 18 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमानणे पोल 'डायरी'च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 42 ते 50 , 'आप' पक्षाला 18 ते 25 जागा तसेच काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे
2013 साली ‘आप’पक्षाने दिल्लीत यश मिळवले होते. तसेच 2020 साली ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपचं कमळ खुलणार का? असे प्रश्नदेखील जनतेच्या मनात उभे राहिले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.