थोडक्यात
फार्मा सेक्टरवर 100 टक्के टॅरिफ लागू
1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100 टक्के टॅरिफची घोषणा
भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कठोर आर्थिक पाऊल उचलले आहे. त्यांनी गुरुवारी जाहीर केले की, येत्या 1 ऑक्टोबर 2025 पासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषध उत्पादनांवर 100 टक्के आयात शुल्क लावले जाईल. या घोषणेमुळे औषध निर्माण कंपन्यांना झटका बसला आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, “जोपर्यंत औषध कंपनी त्यांचे उत्पादन अमेरिकेत घेत नाही, तोपर्यंत आम्ही आयात केलेल्या कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट औषधावर 100 टक्के टॅरिफ लादणार आहोत.मात्र, एखादी औषध कंपनी अमेरिकेत उत्पादन करत असेल तर त्यांच्याकडून कर आकारणी होणार नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, स्वयंपाकघरातील कपाटे, बाथरूम व्हॅनिटीजवर 50 टक्के, गादीदार फर्निचरवर 30 टक्के आणि जड ट्रकवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. “राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि इतर आवश्यक कारणांसाठी” ही पावले उचलली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा औषध पुरवठादार आहे. फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने निर्यात केलेल्या 27.9 अब्ज डॉलर्स किमतीच्या औषधांपैकी जवळपास 8.7 अब्ज डॉलर्सची निर्यात अमेरिकेत झाली. 2025 च्या पहिल्या सहामाहीतच 3.7 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे.
सध्या अमेरिका वापरत असलेल्या जनरिक औषधांपैकी सुमारे 45 टक्के आणि बायोसिमिलर औषधांपैकी 15 टक्के भारताकडून येतात. डॉ. रेड्डीज, सन फार्मा, झायडस, ऑरोबिंदो फार्मा आणि ग्लँड फार्मा यांसारख्या कंपन्या अमेरिकन बाजारातून 30 ते 50 टक्के महसूल मिळवतात. त्यामुळे अमेरिकेच्या नव्या धोरणाचा या कंपन्यांवर थेट परिणाम होऊ शकतो.
विशेष म्हणजे, अमेरिकन ग्राहक भारतातून मिळणाऱ्या स्वस्त जनरिक औषधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. शुल्क वाढल्यास औषधांचे दर वाढण्याची, महागाईला चालना मिळण्याची आणि काही औषधांची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच्याआधीच ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर 50 टक्के कर लावला होता. त्याचबरोबर, रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल 25 टक्क्यांचा अतिरिक्त दंडही त्यांनी लावला आहे.