थोडक्यात
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम
लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे अमेरिकेत आता प्रवेश मिळणार नाही
नव्या नियमांची तात्काळ अंमलबजावणी
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यांनी आरोग्याला केंद्रस्थानी मोठा निर्णय घेतला असून नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्हिसा अर्जदारांच्या आरोग्य स्थितीकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जाणार आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग किंवा मानसिक आजार असलेल्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी या आदेशात दिला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दूतावास व वाणिज्य दूतावासांना पाठवलेल्या नव्या निर्देशांमध्ये अर्जदारांच्या आरोग्याचे मूल्यांकन अनिवार्य करण्यात आले आहे. या मूल्यांकनात त्यांच्या वजन, शारीरिक तंदुरुस्ती, चयापचय विकार, मानसिक स्थिती तसेच इतर दीर्घकालीन आजारांचा विचार केला जाणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “जर अर्जदाराच्या आरोग्य स्थितीमुळे तो अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ओझे ठरू शकतो, तर त्याला प्रवेश नाकारावा,” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
यापूर्वीही व्हिसा प्रक्रियेत आरोग्य तपासणीचा समावेश होता, मात्र ती प्रामुख्याने संसर्गजन्य आजारांपुरती मर्यादित होती. जसे की क्षयरोग किंवा लसीकरणाशी संबंधित बाबी. परंतु नव्या नियमांनुसार, आता ही व्याप्ती वाढवण्यात आली असून अर्जदाराच्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा सखोल विचार करूनच व्हिसा मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अर्जदाराच्या वैद्यकीय अहवालानुसार अधिकारी त्यांचा अर्ज नाकारू शकतात.
या बदलानंतर व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदाराच्या आरोग्य अहवालावरून व्हिसा मंजूर किंवा नाकारण्याचा थेट अधिकार मिळाला आहे. या नव्या धोरणामुळे अनेक देशांतील अर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता या निर्णयानुसार अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना लठ्ठपणा किंवा मधुमेहासारख्या आरोग्य समस्या असल्यास त्यांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो.