अमेरिकेने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर ३० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या पत्रांमध्ये म्हटले आहे की युरोपियन युनियन आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर १ ऑगस्टपासून ३०% अमेरिकन कर आकारला जाईल. युरोपियन युनियनला आशा होती की २७ देशांच्या या गटासाठी अमेरिकेसोबत एक व्यापक व्यापार करार होईल. पण तसे झाले नाही, ट्रम्पने त्यावर टॅरिफ बॉम्ब टाकला आहे.
अमेरिकेने जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि ब्राझीलसह अनेक देशांवर आधीच नवीन शुल्क लादले आहे. हे शुल्क १ ऑगस्टपासून या देशांवर लागू होतील. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व देशांना ९ जुलैची अंतिम मुदत दिली होती.
मेक्सिकन नेत्याला लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी कबूल केले की मेक्सिकोने अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांचा आणि 'फेंटानिल'चा प्रवाह रोखण्यास मदत केली आहे. तथापि, त्यांनी सांगितले की मेक्सिकोने उत्तर अमेरिकेला नार्को-तस्करीचे ठिकाण बनण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत.
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर त्यांनी अनेक शुल्क लागू केले आहेत. यामुळे अमेरिकन सरकारला दरमहा अब्जावधी डॉलर्सचा नवीन महसूल मिळत आहे. यूएस ट्रेझरीच्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात जूनपर्यंत सीमाशुल्कातून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.