(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान व दक्षिण कोरियातून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला असून, मलेशिया, कझाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, लाओस आणि म्यानमार या देशांवरही नव्या दराने शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क 1 ऑगस्टपासून अंमलात येणार आहे.
ट्रम्प यांनी Truth Social या माध्यमातून या देशांच्या प्रमुखांना उद्देशून खुली पत्रे पोस्ट केली. या पत्रांमध्ये त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर संबंधित देशांनी प्रत्युत्तरादाखल कर वाढवले, तर अमेरिकाही अधिक कडक पावले उचलेल. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जाए-म्युंग यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प म्हणाले, “तुमच्या करवाढीइतकी वाढ आमच्या 25% करामध्ये जोडली जाईल.”
या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असून, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. तरीही ट्रम्प यांचा दावा आहे की, देशांतर्गत उत्पादनास चालना देण्यासाठी आणि नव्या करसवलतींसाठी निधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक पाऊल आहे.
नवीन दरांनुसार मलेशियावर 25%, कझाकिस्तानवर 25%, दक्षिण आफ्रिकेवर 30%, तर लाओस आणि म्यानमारवर प्रत्येकी 40% कर लावण्यात येणार आहे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, प्रत्येक देशासाठी वेगळी व्यापारी रणनीती राबवली जात आहे.
दरम्यान, चीनवरील आयातीवर आधीच 55% कर लावण्यात आले आहेत, तर युरोपियन युनियन व भारतासोबतही व्यापारविषयक चर्चेत तणाव कायम आहे. या घोषणेनंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण झाली असून, कर्ज दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत.