अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर व्यापारी कर लादले आहे. त्यामुळे अनेक उत्पादनांवर आणि त्यांच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. अमेरिका, भारतासह अनेक देशातील शेअर बाजारात गेल्या आठवड्याभरापासून घसरण पाहायला मिळते आहे. अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये लॉकडाऊननंतरची सर्वात मोठी घसरण शुक्रवारी झाली. याचपार्श्वभूमिवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रूथ या सोशल मीडियावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी पोस्ट शेअर केली आहे. "मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही, असं म्हणत श्रीमंत होण्याची हीच उत्तम वेळ आली" असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शेअर बाजार घसरणीनंतर ट्रम्प यांची पोस्ट
शेअर बाजाराच्या घसरणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जी मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये “अमेरिकेत येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनो, मी माझ्या धोरणांमध्ये कधीही बदल करणार नाही. श्रीमंत होण्याची, पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होण्याची ही उत्तम वेळ आहे!”, असं म्हटलं आहे.