स्पेसएक्सची उपग्रह आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंक लवकरच भारतात सुरू होणार आहे. भारत सरकारकडून स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट (LOI) प्रदान करण्यात आले असून, ही सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेतला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. स्टारलिंक सध्या जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, आता भारतातील वापरकर्त्यांसाठी देखील ही सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. वेगवान आणि कमी लेटन्सीचा इंटरनेट अनुभव देण्याचे स्टारलिंकचे उद्दिष्ट आहे.
स्टारलिंक कंपनी कसली आहे ?
स्टारलिंक ही पारंपरिक ब्रॉडबँड सेवेपेक्षा वेगळी उपग्रह-आधारित सेवा आहे. ती जमिनीवरील फायबर नेटवर्कवर अवलंबून नसून, थेट आकाशातील सॅटेलाइट्समधून सिग्नल प्रसारित करते. वापरकर्त्याच्या घराच्या छतावर लावलेल्या विशेष डिशमार्फत हे सिग्नल प्राप्त होतात. यासाठी स्पेसएक्सने हजारो उपग्रहांचे जागतिक नेटवर्क उभारले आहे.
भारतातील संभाव्य किंमत
अहवालानुसार, भारतात स्टारलिंकच्या मासिक सबस्क्रिप्शनची किंमत ₹३,००० ते ₹७,००० दरम्यान असण्याची शक्यता आहे. याशिवाय, ग्राहकांना एकवेळ इन्स्टॉलेशन किट खरेदी करावे लागेल. सध्या अमेरिकेत हे किट सुमारे ₹३०,००० मध्ये विकले जाते.
पुढील रणनीती काय असणार ?
लेटर ऑफ इंटेंटनंतर स्टारलिंक भारतातील विविध मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून सेवा सुरू करेल. ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये जलद इंटरनेट पोहोचवण्याचा स्टारलिंकचा उद्देश आहे.