(India-China Flight) गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन थेट उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास पाच वर्षांनंतर दोन्ही देशांमधील नातेसंबंधात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असून, पुढील महिन्याच्या सुरुवातीला थेट विमानसेवा पुन्हा सुरू होऊ शकते.
केंद्रीय सरकारने एअर इंडिया, इंडिगो यांसारख्या विमान कंपन्यांना चीनकडे तातडीने उड्डाणे सुरू करण्यासाठी तयारी ठेवण्यास सांगितले आहे. कोरोना महामारीपूर्वी दरमहा सुमारे 539 थेट उड्डाणे होत होती. ऑगस्ट अखेरीस होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
अलीकडेच भारताने 24 जुलैपासून चिनी पर्यटकांना व्हिसा जारी करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. तसेच,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संवाद वाढला आहे. एससीओ परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदींच्या भेटीचे चीनने स्वागत केले असून, सात वर्षांनंतर होणारी ही भेट द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाची मानली जाते.