थोडक्यात
नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीची हत्या
झालानाथ खनाल यांच्या पत्नीची हत्या
आंदोलकांनी राज्यलक्ष्मी चित्रकरांना जाळलं
उपचारादरम्यान राज्यलक्ष्मी यांचा मृत्यू
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये आता माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरालाही आग लावण्यात आली आहे. राजधानी काठमांडूतील डल्लू परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला आणि घर पेटवून दिले. या घटनेत झालानाथ खनाल यांची पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर गंभीर जखमी झाल्या आहेत.
आग लागली तेव्हा त्या घरातच होत्या. अचानक उसळलेल्या आगीमुळे त्यांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही आणि त्या भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीराचे मोठे भाग गंभीरपणे भाजले आहेत. केवळ बाह्य जखमा नव्हे, तर त्यांच्या फुफ्फुसांवरही आगीचा गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे त्यांची स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात हिंसाचाराची लाट उसळली आहे. संसद भवन, नेत्यांची घरे आणि सरकारी इमारतींवर आंदोलकांनी हल्ले करून जाळपोळ केली आहे. या पार्श्वभूमीवर झालानाथ खनाल यांच्या घराला लागलेल्या आगीची घटना मोठी दुर्दैवी ठरली आहे.
या घटनेनंतर काठमांडूतील सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून, पोलिस आणि लष्कराने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र वाढत्या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि देशातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण आणखीच ढवळून निघाले आहे.