जगभरात वाढत चाललेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका-विरोधी धोरण राबवणाऱ्या तीन देशांचे राष्ट्राध्यक्ष थेट अमेरिकेच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली असून, हे नेते कधीही लक्ष्य बनू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोलंबिया, व्हेनेझुएला आणि इराण हे तिन्ही देश सध्या अमेरिकेच्या दृष्टीने “शत्रूराष्ट्र” मानले जातात. ट्रम्प यांनी या देशांतील विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात उघडपणे कठोर वक्तव्ये करत, अप्रत्यक्षपणे जीवाला धोका असल्याचे संकेत दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.
अमेरिकेचा रोष नेमका का?
ट्रम्प प्रशासनाने कोलंबिया आणि व्हेनेझुएलावर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि कोकेन तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेलसाठ्यावर अमेरिकेची नजर असल्याचेही लपून राहिलेले नाही.
इराणबाबत बोलायचे झाले तर, अणुप्रकल्प हा मुद्दा अमेरिकेसाठी कायमच चिंतेचा ठरला आहे. इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवावा, अशी अमेरिकेची भूमिका असून, ट्रम्प यांनी यासंदर्भात थेट अल्टिमेटमही दिल्याचे सांगितले जाते. अमेरिका थेट हल्ला न करता इस्रायलच्या माध्यमातून इराणवर दबाव वाढवण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
कोण आहेत अमेरिकेच्या निशाण्यावर?
निकोलस मादुरो (व्हेनेझुएला)
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याबाबत ट्रम्प यांनी अतिशय तीव्र भाषा वापरली आहे. “मादुरो यांनी देश सोडावा, अन्यथा काहीही होऊ शकते,” असे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याचा दावा केला जात आहे. या विधानानंतर मादुरो यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी क्यूबन एजंट्सची मदत घेतली आहे. मादुरो यांचा आरोप आहे की, अमेरिका त्यांना ठार मारून व्हेनेझुएलाच्या तेलसंपत्तीवर ताबा मिळवू पाहत आहे.
मसूद पेझेश्कियान (इराण)
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यावरही धोका असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यादरम्यान त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ते या हल्ल्यातून बचावले. इराणने स्पष्ट भूमिका घेतली असून, कोणत्याही दबावाखाली अणुप्रकल्प थांबवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
गुस्तावो पेट्रो (कोलंबिया)
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनाही ट्रम्प यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. “पेट्रो यांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. ते जे करत आहेत, ते आम्ही सहन करणार नाही,” असे धमकीवजा विधान ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जाते. यामुळे कोलंबियामधील राजकीय वातावरणही तणावपूर्ण बनले आहे.
जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण
या तिन्ही राष्ट्राध्यक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात अस्वस्थता वाढली आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे केवळ संबंधित देशच नव्हे, तर संपूर्ण जागतिक राजकारण अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अमेरिकेची पावले नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.