अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामध्ये अकोल्यातील ऐश्वर्या तोष्णीवालने अत्यंत धाडसीपणे स्वतःचा जीव वाचवला. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मेडिकल कॉलेजमध्ये डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी ऐश्वर्या अपघातावेळी कॉलेजच्या होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीत, पाचव्या मजल्यावर झोपलेली होती.
अपघाताच्या वेळी जोराचा आवाज झाल्याने ऐश्वर्याची झोपमोड झाली. उठून पाहिलं तर सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, तिने स्वतःभोवती चादर लपेटली आणि अंधार, धूर, गोंधळ यामधून मार्ग काढत खाली उतरली. तिच्या चेहऱ्यावर आणि हातपायावर किरकोळ भाजल्याचेही निदर्शनास आले आहे.
अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर ऐश्वर्याने घाबरलेल्या अवस्थेत अकोल्यातील आपल्या वडिलांना फोन केला. वडील अमोल तोष्णीवाल हे त्या वेळी दुकानात होते. मुलीचा फोन येताच त्यांनी दुकान बंद करून घरी धाव घेतली. ऐश्वर्याची सुखरूप माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब सुटकेचा निश्वास टाकत भावनिक झालं.
कालच ऐश्वर्या आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अहमदाबादला परतली होती. आजोबांनी सांगितले की, पोती आनंदानं भेटायला आली होती आणि त्यानंतर अशी घटना घडली यावर विश्वासच बसत नाही. त्यांनी आणि संपूर्ण कुटुंबाने या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करत, ऐश्वर्याच्या जीवित बचावासाठी देवाचे आभार मानले आहेत.