हिमाचल प्रदेशात सलग दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. 20 जूनपासून आतापर्यंत कमीत कमी 69 नागरिकांचा जीव गेला असून, सुमारे 400 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंडी जिल्ह्यात तब्बल 16 ठिकाणी ढगफुटीची नोंद झाली असून, 3 वेळा पूरस्थितीही निर्माण झाली. यामुळे अनेक घरं कोसळली आहेत आणि शेकडो वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. संपूर्ण राज्यात सध्या जवळपास 400 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून, 500 हून अधिक वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. सुमारे 700 पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात 7 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्य प्रशासन, NDRF, SDRF, लष्कर, पोलीस दल आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अधिकृत इशाऱ्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव डी. सी. राणा यांनी माहिती दिली की, नुकसान झालेली रक्कम 400 कोटींपर्यंत पोहोचली असली तरी प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सध्या बचावकार्य हाच मुख्य उद्देश असून, नुकसानाचा नेमका अंदाज घेण्यासाठी अधिक वेळ लागेल, असंही ते म्हणाले.
हवामान बदलाचा हिमाचलच्या निसर्गावर मोठा परिणाम होत असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पर्यावरणीय असंतुलन आणि तापमानवाढीचा फटका या भागाला अधिक जाणवतो आहे, असंही त्यांनी नमूद केलं.