थोडक्यात
अमेरिकेत सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या माध्यमांची गळचेपी
'विरोधात जाल तर थेट चॅनेल्सवर बंदी आणेन'
ट्रम्प यांची अमेरिकेन प्रसारमाध्यमांना उघड धमकी
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आता प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. "अमेरिकेतील 97 टक्के टीव्ही नेटवर्क्स माझ्या विरोधात आहेत आणि सतत नकारात्मक बातम्याच प्रसारित करतात," असा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर "जर असेच सुरु राहिले, तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा विचार केला जाऊ शकतो," असा इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्प यांच्या वक्तव्यांनंतर अमेरिकेतील मीडिया क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ (FCC) या संस्थेचा उल्लेख करत ट्रम्प यांनी म्हटले की, "नेटवर्क्सना सरकारकडून परवाना मिळतो, मग चुकीच्या बातम्या देणाऱ्या चॅनेल्सवर कारवाई का होऊ नये?" तथापि, एफसीसीच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद आहे की,ते सीबीएस, एनबीसी, एबीसी किंवा फॉक्ससारख्या मोठ्या नेटवर्क्सना थेट परवाना देत नाही.
या पार्श्वभूमीवर एबीसी नेटवर्कने लोकप्रिय विनोदी कलाकार जिमी किमेलचा कार्यक्रम अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. किमेल यांनी एका कार्यक्रमात ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर केलेल्या टीकेमुळे हा वाद निर्माण झाला होता. एबीसीच्या निर्णयाचे स्वागत करत ट्रम्प म्हणाले, "किमेलमध्ये काहीही टॅलेंट नव्हते आणि त्यांचे रेटिंग्सही सातत्याने घसरत होते. त्यांना आधीच काढून टाकायला हवे होते."
अमेरिकन माध्यमे आणि प्रशासन यांच्यातील या संघर्षामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य आणि नेटवर्क्सची भूमिका यामुळे येत्या काळात अमेरिकेतील मीडिया-राजकारण संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.