जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी सैन्यदलाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी भारताविषयी एक दावा केला आहे.
यासोबतच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारत पहलगाम हल्ल्याच्या घटनेचा खोटा बहाणा करुन येत्या 24 किंवा 36 तासात लष्करी हल्ला करु शकतो. आम्ही कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरला आहे. याचा आम्ही कायम निषेध केला आहे. या हल्ल्याची तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. असे पाकिस्तानचे माहिती मंत्री यांनी म्हटले आहे.