(India on Donald Trump Tariffs) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर नवीन आयात टॅरिफ लावण्याचा इशारा दिल्यानंतर भारत सरकारकडून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करून स्पष्टपणे सांगितले की, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारताला अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या त्यांच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत भारतावर 25% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. त्यांच्या मते, भारताकडून अमेरिकन वस्तूंवर लावले जाणारे कर हे जगातील सर्वाधिक आहेत आणि भारताचे रशियाशी वाढते व्यापारी संबंध आणि BRICS गटातील सक्रियता अमेरिकेच्या हिताविरुद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला.
परराष्ट्र मंत्रालयाने ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “युक्रेन युद्धानंतर जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली. युरोपने रशियाकडील पारंपरिक पुरवठा वळविल्यामुळे भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली. जागतिक स्तरावरील ऊर्जा बाजारपेठेतील समतोल टिकवण्यासाठी अशा प्रकारची आयात करण्यास अमेरिकेने भारताला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे आता भारतावर टीका करणे हे अत्यंत विरोधाभासी आहे.”
भारत सरकारने अमेरिकेच्या टॅरिफ इशाऱ्याला ठामपणे प्रत्युत्तर दिले असून, रशियासोबतच्या व्यापारावरून भारताला लक्ष्य करणे हे दुजाभावाचे आणि अनुचित पाऊल असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय हे भारताच्या हितासाठी आवश्यक असून, देश कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्ततेचे रक्षण करेल, हे या निवेदनातून अधोरेखित झाले आहे.