इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेला संघर्ष दुसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. युद्धबंदीसाठी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे इराण आणि युरोपीय देशांमधील चर्चेला कोणताही निकाल लागलेला नाही. या दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी मसूद पेझेश्कियान यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून इस्रायल आणि इराणला तणाव कमी करण्याचे आणि एकमेकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, "इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो @drpezeshkian आम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. अलिकडच्या काळात वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तणाव कमी करण्यासाठी, संवाद आणि राजनयिकतेचा मार्ग म्हणून आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आमचे आवाहन पुन्हा एकदा मांडले".
इराणच्या अणुकार्यक्रमाला आळा घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अणुकेंद्रांवर, फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर हल्ला केला. त्यानंतर इराणदेखील अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता इराण आणि इस्रायलची भूमिका काय असणार आहे? याकडे संपूर्ण जगाचे लागले आहे.