(India-UK Trade Deal) भारत आणि युनायटेड किंग्डम (UK) यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (Free Trade Agreement - FTA) अखेर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या असून हा करार दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्याचा नवीन अध्याय सुरू करणार आहे. 6 मे 2025 रोजी या करारावर औपचारिक सहमती देण्यात आली.
यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या कराराला “ऐतिहासिक” असे संबोधले असून, यामुळे ब्रिटनमध्ये नवीन गुंतवणुकीला चालना, रोजगार निर्मिती, आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धीस मदत होईल, असे नमूद केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या करारावर चर्चा सुरू होती. व्यापार, गुंतवणूक, उत्पादन आणि सेवा यामध्ये सुलभतेसाठी दोन्ही सरकारांनी विस्तृत पातळीवर वाटाघाटी केल्या. आता या कराराच्या अंमलबजावणीनंतर भारत-यूके संबंध अधिक घट्ट होणार आहेत.
भारताकडून 90% ब्रिटिश उत्पादनांवरील आयात शुल्क कमी होणार, तर त्यातील 85% वस्तूंवर पूर्ण सूट दिली जाणार आहे. भारताच्या 99% निर्यात वस्तूंना UK मध्ये सवलती किंवा करमुक्त प्रवेश मिळणार आहे.यामुळे वस्त्रोद्योग, रत्न व दागिने, अभियांत्रिकी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, तसेच ब्रिटीश स्कॉच व लक्झरी कार्स यासारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होईल. UK सरकारच्या अंदाजानुसार, यामुळे ब्रिटनच्या जीडीपीत 4.8 अब्ज पाउंडची भर पडेल आणि वार्षिक मजुरीत 2.2 अब्ज पाउंडची वाढ होईल.
हा करार कौशल्य विकास, सेवा क्षेत्रातील रोजगार, आणि विदेशी बाजारात भारतीय कंपन्यांची उपस्थिती वाढवण्यास हातभार लावेल. विशेषतः स्टार्टअप्स आणि आयटी-सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. या कराराच्या अनुषंगानेच दोन्ही देशांनी ‘UK-India Vision 2035’ हे दीर्घकालीन धोरण जाहीर केले. या आराखड्यात संरक्षण, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित तंत्रज्ञान, आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.