इराण-इस्रायल यांच्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. एकमेकांना प्रत्युत्तर देत हल्ले चढवले जात आहेत. अशातच आता इराणने डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र थेट इस्रायली शहरातील बेरशेबा येथील सोरोका रुग्णालयावर आदळला, ज्यामुळे रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले.रुग्णालयाच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले, काचेचे तुकडे आणि ढिगारे विखुरले गेले आणि अनेक लोक जखमी झाले, ज्यात एका ६० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे ज्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या सोरोका मेडिकल सेंटरने जनतेला सध्या रुग्णालयात येऊ नये असे आवाहन केले आहे.
दरम्यान या भयंकर हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, "इराणच्या दहशतवादी राज्यकर्त्यांनी देशाच्या मध्यवर्ती भागातील सोरोका रुग्णालय आणि नागरिकांवर क्षेपणास्त्रे डागली. आम्ही तेहरानच्या या जुलमी लोकांना त्याची पूर्ण किंमत मोजायला लावू."इस्रायलने इराणच्या अरक हेवी वॉटर रिअॅक्टरवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, जे इराणने रिकामे केले होते, त्यामुळे रेडिएशनचा कोणताही धोका नोंदवला गेला नाही.
त्यामुळे आता इराण-इस्रायल युद्धाला आणखी कोणते स्वरूप येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या युद्धावर येत्या दोन दिवसांत मत मांडणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.