इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, इराणला मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर प्रवेश आहे आणि गरज पडल्यास ते कारवाई करू शकतात. कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जर शत्रूने हल्ला केला तर मोठी किंमत मोजावी लागेल.
खामेनेई यांचे ट्वीट चर्चेत
"इराणने अमेरिकेच्या तोंडावर जोरदार चपराक मारली आहे. आम्ही त्यांच्या अल-उदेइद हवाई तळावर हल्ला करून नुकसान केले, जो या प्रदेशातील प्रमुख अमेरिकन तळांपैकी एक आहे," असे खामेनी यांनी ट्विटरवर पोस्ट केले. युद्धबंदीनंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी इराणचे अभिनंदन केले आणि म्हटले, "अमेरिकन सरकारने थेट युद्धात प्रवेश केला आहे. अमेरिकेने हे केले कारण त्यांना वाटले होते की इस्रायल पूर्णपणे नष्ट होईल." अमेरिकेने इस्रायलला वाचवण्यासाठी युद्धात प्रवेश केला पण त्यांना काहीही मिळाले नाही.
ट्रम्प यांचे वक्तव्य चर्चेत
युद्धबंदी कराराबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, "इस्रायल आणि इराण जवळजवळ एकाच वेळी त्यांच्याकडे आले आणि शांततेबद्दल बोलले. मला माहित होते की आता वेळ आली आहे. जग आणि मध्य पूर्व हे खरे विजेते आहेत. दोन्ही राष्ट्रांना त्यांच्या भविष्यात प्रचंड प्रेम, शांती आणि समृद्धी दिसेल. त्यांना खूप काही मिळवायचे आहे."
22 जून 2025 रोजी ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर हल्ला करून ते नष्ट केले. या मोहिमेत 125 हून अधिक विमाने,7 बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स आणि 30 हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रे होती. या हल्ल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, इराणच्या सर्व अणु तळांचे खूप नुकसान झाले आहे.