इराणमधील अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे. यावर पाकिस्ताननेदेखील अधिकृत प्रतिक्रिया दिली असून अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जाहीर करत अमेरिकेकडून इराणच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानने स्पष्ट केलं की, "हे हल्ले प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. यामुळे केवळ इराणच नाही तर संपूर्ण मध्य-पूर्वेत तणाव आणि हिंसेत वाढ होण्याची शक्यता आहे. या कृतींमुळे संपूर्ण जागतिक शांततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे", असेही पाकिस्तानने नमूद केले.
पाकिस्तानने हे देखील म्हटले आहे की, "इराणला स्वतःच्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. अमेरिकेची ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकारच्या लष्करी हस्तक्षेपाला समर्थन देता येणार नाही, असं पाकिस्तानचे म्हणणं आहे. पाकिस्तानने सर्व देशांना आवाहन केलं की, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं आणि युद्धजन्य कारवाया थांबवाव्यात. शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक उपाय शोधणं अत्यावश्यक आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र चार्टरचे तत्त्व पाळणं हाच योग्य मार्ग आहे", असा संदेश पाकिस्तानने दिला आहे.
दरम्यान पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिल्यानंतरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा याबद्दल पाकिस्तान समर्थन करत होते. मात्र आता पाकिस्तानने नोंदवलेल्या निषेधानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या मैत्रीवर प्रश्नदेखील उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया दिली असताना इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेचा सहभाग हा विषय पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.