भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. SpaDeX मिशन अंतर्गत अवकाशात उपग्रहांचे यशस्वीपणे डॉकिंग केलं आहे. ज्यामुळे भारत डॉकिंग आणि अनडॉकिंग क्षमता असलेला जगातील चौथा देश बनला आहे. भारत युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन या राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे ज्यांनी इन-स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानामध्ये प्रभुत्व मिळवले आहे.
16 जानेवारी 2025 च्या पहाटे डॉकिंगचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दोन उपग्रहांना अतंराळामध्ये जोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. SpaDeX मिशनमध्ये दोन उपग्रहांचा समावेश होता. SDX01 (चेझर) आणि SDX02 (लक्ष्य) या उपग्रहांचे वजन अंदाजे 220 किलोग्रॅम आहे.
इस्रोने सोशल मीडिया साईट एक्सवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून यासंंबंधी अधिक माहिती दिली आहे. "15m ते 3m होल्ड पॉईंटपर्यंतचे डॉकिंग पूर्ण झाले. अचूकतेने सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे स्पेसक्राफ्ट यशस्वीपणे कॅप्चर केले गेले. डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले," असं इस्रोने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
30 डिसेंबर 2024 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटमार्फत स्पेडेक्स मिशनचे प्रक्षेपण करण्यात आले होते. उपग्रह सुरुवातीला पृथ्वीच्या 475 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यात आले होते.
इस्रोने सुरुवातीला 7 जानेवारी आणि नंतर 9 जानेवारी रोजी डॉकिंगचे वेळापत्रक आखले होते. परंतु तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर इस्रोने 11 जानेवारी रोजी डॉक करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉकिंगच्या काही क्षण आधी ते रद्द करण्यात आले.
डॉकिंग तंत्रज्ञान भारतासाठी का आहे महत्त्वाचं?
इस्रोने डॉकिंग तंत्रज्ञान सिद्ध करून अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान निर्माण केलं आहे. भारताच्या चांद्रयान ४ आणि भारतीय अंतरीक्ष स्टेशन (BAS) च्या विकासासाठी तसेच भविष्यातील इतर मोहिमांसाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. SpaDeX मिशन केवळ इस्रोच्या अभियांत्रिकी क्षमतांचे प्रदर्शन नाही तर अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा देखील दर्शवते.
स्पेस डॉकिंग क्षमता जटिल मोहिमांसाठी अत्यावश्यक आहे. भारताच्या भविष्यातील सखोल अंतराळ संशोधन आणि 2040 पर्यंत चंद्रावर संभाव्य क्रू मिशनसाठी मार्ग मोकळा होईल. डॉकिंगच्या यशस्वी प्रयोगामुळे चांद्रयान ४ मोहिमेचा मार्ग मोकळा झाला आहे. चांद्रयान ४ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावरून खडक आणि मातीचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणण्याची ही महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.