सध्या सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एक विचित्र पण गोंडस बाहुली सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे 'लबुबू डॉल'. या बाहुलीसाठी लोक तासन्तास रांगेत उभे राहत आहेत, तर काहीजण चक्क परदेशात जाऊनही तिला खरेदी करत आहेत. काही डिझाइन्स तर हजारो डॉलर्समध्ये विकले जात आहेत. मग ही लबुबू डॉल आहे तरी काय? तिच्यामागची क्रेझ इतकी का वाढली आहे?
बालपणापासून बाहुल्यांचं आकर्षण
बाहुली ही प्रत्येकाच्या बालपणाचा एक अविभाज्य भाग असते. बार्बीपासून ते ‘तात्या विंचू’पर्यंत अनेक प्रकारच्या बाहुल्या बाजारात येत गेल्या. मात्र सध्या जी बाहुली चर्चेत आहे, ती इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि काहीशी विचित्रही आहे. ‘लबुबू डॉल’ नावाची ही बाहुली मोठ्या डोळ्यांनी, अजब हास्याने आणि डोक्यावरच्या दोन शेंड्यांनी वेगळी वाटते. तिचं दिसणं काहींना ‘क्युट’ वाटतं, तर काहींना ती ‘भीतिदायक’ किंवा ‘कुरूप’ वाटते.
सेलिब्रिटींच्या हातात लबुबू
या बाहुलीची क्रेझ सेलिब्रिटींनी आणखी उंचावली. रिहाना, दुआ लिपा, के-पॉप बँड 'ब्लॅकपिंक'ची लिसा, अनन्या पांडे आणि करण जोहर यांच्याकडे ही डॉल दिसल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही ती ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाली.
लबुबूची निर्मिती कशी झाली?
लबुबू डॉलचे डिझायनर केसिंग लंग हे हाँगकाँगमधील एक कलाकार आहेत. त्यांनी 2015 मध्ये ही बाहुली डिझाइन केली. युरोपियन लोककथांतील पात्रांपासून प्रेरणा घेतलेल्या ‘The Monsters’ या सिरीजमधून लबुबूचा जन्म झाला. 2019 मध्ये चिनी खेळण्यांची कंपनी ‘पॉप मार्ट’ने ही बाहुली तयार करायला सुरुवात केली आणि तिने बाजार गाजवला. 2024 मध्ये ‘पॉप मार्ट’चा नफा 188% वाढला आणि या यशामागे लबुबू डॉलचा मोठा वाटा आहे. कंपनीच्या महसुलात तब्बल 726.6% वाढ झाली. या यशामुळे ‘पॉप मार्ट’चे सीईओ वांग निंग हे चीनमधील दहा श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.
महागड्या किंमती आणि ब्लाइंड बॉक्स युक्ती
लबुबू डॉल्स 20 ते 30 डॉलर्स दरात ‘ब्लाइंड बॉक्स’मध्ये विकल्या जातात. म्हणजे ग्राहकाला बॉक्स उघडल्यावरच त्यात कोणती बाहुली आहे ते समजते. या सरप्राइज फॅक्टरमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हिडीओज व्हायरल होतात. या खेळण्यांचा पुरवठा कमी असून ‘कृत्रिम टंचाई’ निर्माण केली जाते. त्यामुळे एकच डिझाइन असलेल्या डॉल्ससाठी हजारो डॉलर्स मोजले जातात. उदाहरणार्थ, ‘श्री वाइज लबुबू’ 28,300 डॉलर्सना, तर ‘सॅकाई-सेव्हेंटीन लबुबू’ 31,250 डॉलर्सना लिलावात विकल्या गेल्या. एक मानवी आकाराची लबुबू डॉल 1.5 लाख डॉलर्सला विकली गेल्याचीही नोंद आहे.
लबुबू x Vans कोलॅबरेशन
2023 मध्ये डिझाइन झालेल्या एका लबुबू डॉल आणि शू ब्रँड Vans यांचं कोलॅबरेशन झाल्यानंतर त्या डिझाइनसाठी eBay वर तब्बल 10 हजार डॉलर्सपर्यंत बोली लागली. मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या या बाहुल्यांचे डिझाइन्स अधिक ‘एक्स्क्लुझिव्ह’ मानले जात आहेत.
काळाबाजार आणि बनावट लबुबू
लबुबूची लोकप्रियता इतकी वाढली की चीनमध्ये तिचा काळाबाजार सुरू झाला आहे. बनावट डॉल्स, ज्यांना 'लाफुफु' असं नाव दिलं जातं, त्यांचं प्रमाणही वाढलं आहे. चिनी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 46,000 बनावट लबुबू खेळण्यांची जप्ती केली. या बाहुल्यांची चोरीही वाढली असून काही मालक ती परदेशात नेताना तिचा विमा उतरवत आहेत!
किती प्रकार आहेत?
आजपर्यंत 300 हून अधिक रंग आणि डिझाइन्समध्ये लबुबू डॉल्स बाजारात आले आहेत. 3 इंचाच्या डॉलची किंमत 15 डॉलर्सपासून तर 31 इंचाच्या डॉलची किंमत जवळपास 960 डॉलर्सपर्यंत जाते.
टीकेचा सामना
‘ब्लाइंड बॉक्स’ युक्तीमुळे अनेकांनी ‘पॉप मार्ट’वर टीका केली आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या या मॉडेलवर जुगार खेळवण्याचा आरोप केला जातो. मात्र या सर्व चर्चांमध्येही लबुबू डॉलची लोकप्रियता आणि आर्थिक यश ही गोष्ट स्पष्ट करते — की मार्केटिंग, क्रिएटिव्ह डिझाइन आणि सोशल मीडिया यांच्या योग्य संगमातून कोणतीही वस्तू जागतिक ट्रेंड होऊ शकते. लबुबू डॉल हा एक खेळणं आहे की एक स्टेटस सिम्बॉल? हे आज स्पष्ट आहे की, ‘लबुबू’ फक्त एक बाहुली राहिलेली नाही, तर ती एक ‘कल्चर आयकॉन’ बनली आहे!