चीनच्या बिजिंग मधील शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) सर्वांत मोठी बैठक चीनच्या तिआंजिन शहरात 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक महत्त्वाचे जागतिक नेते सहभागी होणार आहेत.
चीनचे उपपरराष्ट्रमंत्री लिऊ बिन यांनी माध्यमांशी संवाद साधताना या बैठकीच्या तयारीबाबत माहिती दिली. या परिषदेत तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह, नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांचीही उपस्थिती राहणार आहे.
यासोबतच सुमारे दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील. यात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस आणि शांघाय सहकार्य संघटनेचे सरचिटणीस नुर्लन येरमेक्बायेव्ह यांचा समावेश आहे.
सध्या SCO मध्ये भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, बेलारूस, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि किरगिस्तान हे देश सदस्य आहेत. बैठकीनंतर अनेक राष्ट्रप्रमुख 3 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या विजय दिनाच्या संचलनालाही उपस्थित राहणार आहेत.