अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेली आग प्रचंड वेगाने पसरत आहे. ही आग आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि हॉलिवूड हिल्सपर्यंत पोहोचली आहे. आगीमुळे एक लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या घरे सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. या भीषण आगीने परिस्थिती आणखी गंभीर केली असून, सध्या अनेक भागांत धुराचे ढग पसरले आहेत आणि घरे जळून खाक झाली आहेत. याच दरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आणि तिची टीम देखील या आगीत अडकले होते. नोरा फतेहीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.
नोरा फतेहीने लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या वणव्यामध्ये अडकली होती. तिच्या टीमला आणि तिला भयानक अनुभव आला. वाढत्या आगीमुळे तिला आणि तिच्या टीमला बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले होते.
नोराचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तिने सांगितलं, मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग वेडीवाकडी आहे. मी कधीच असं काही पाहिले नाही. आम्हाला पाच मिनिटांपूर्वीच बाहेर काढण्याचे आदेश मिळाले म्हणून मी आणि माझ्या टीमने पटकन सामान पॅक केलं आणि मी येथून बाहेर पडलो आहोत. मी विमानतळाजवळ जाऊन तिथे शांत बसणार आहे कारण आज माझी फ्लाइट आहे आणि मला खरोखर आशा आहे की मी ते पकडू शकेन. मला आशा आहे की हे लवकरच थांबेल कारण हे सगळं भयानक आहे.मला आशा आहे की लोक सुरक्षित आहेत, मी याआधी असे कधीही पाहिलं नव्हतं.
लॉस एंजेलिस काउंटीमध्ये जोरदार वाऱ्यामुळे लागलेल्या अनेक विनाशकारी आगीत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, असे सीएनएनने वृत्त दिले आहे. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये नोंदलेली ही सर्वात भीषण आग असल्याचे वर्णन केले आहे. मालिबू आणि सैंटा मोनिका जवळील लॉस एंजेलिसच्या वेस्टसाईडवर पेटलेल्या पॅलिसेड्स आगीत आतापर्यंत किमान १,००० इमारती नष्ट झाल्या आहेत. यामध्ये अनेक स्टार्सची घरेही जाळली गेली आहेत. अनेक स्टार्सची घरेही जळून खाक झाली आहेत, ज्यात एडम ब्रॉडी आणि त्यांची पत्नी लेयटन मीस्टर, अॅना फारिस आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार हेडी मोंटॅग आणि स्पेन्सर प्रॅट यांच्या घरांचा समावेश आहे.