(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख निवडणूक आश्वासनांपैकी एक मानले जाणारे ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अखेर अमेरिकन सिनेटमध्ये पारित झाले आहे. या विधेयकाला ‘वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट’ असे अधिकृत नाव देण्यात आले असून, ते 51 विरुद्ध 50 अशा अल्प मताधिक्याने मंजूर करण्यात आले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून या विधेयकावर मोठी राजकीय चर्चा सुरू होती. उद्योगपती एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यात याच विधेयकावरून मतभेद झाले होते, ज्यामुळे दोघांमध्ये वादही उफाळून आला होता. आता सिनेटमधून मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक पुढील टप्प्यात प्रतिनिधी सभागृहात मांडले जाणार असून, तिथेही लवकरच मतदान अपेक्षित आहे.
हे विधेयक ट्रम्प यांच्या राजकीय अजेंड्याचा केंद्रबिंदू मानले जात आहे. त्यांच्या अनेक धोरणात्मक संकल्पनांचा आणि निवडणूक प्रचारातील आश्वासनांचा या बिलात समावेश करण्यात आलेला आहे. परदेशी आयातीवर कर लावणे, बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना प्राधान्य देणारे धोरण राबवणे या सर्व मुद्द्यांचा यात समावेश आहे.
ट्रम्प यांच्या काही योजना कार्यकारी आदेशाद्वारे लागू शकतात, पण अनेक धोरणांसाठी कायद्यात बदल आवश्यक आहे, आणि यासाठी काँग्रेसची मंजुरी अनिवार्य आहे. याच पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करून ट्रम्प यांनी काँग्रेससमोर मांडले होते. सिनेटमधून मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक कायदेशीर अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे.