पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक भीषण दहशतवादी हल्ला घडला असून, ओळख पटवून तब्बल 9 प्रवाशांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हे सर्व प्रवासी पंजाब राज्यातील असून, क्वेटाहून लाहोरकडे प्रवास करत होते.
ही घटना झोब जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर घडली. हल्लेखोरांनी बस थांबवून प्रवाशांची ओळख विचारली आणि त्यानंतर निवडक 9 जणांवर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, हल्ल्याच्या चौकशीस सुरुवात झाली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र यापूर्वी बलुचिस्तानमध्ये बलोच लिबरेशन आर्मी सारख्या संघटनांनी अशा स्वरूपाचे हल्ले केले आहेत. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी ही घटना दहशतवादी कृत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
मार्च महिन्यात अशाच प्रकारे बलोच लिबरेशन आर्मीने ‘जाफर एक्सप्रेस’ या प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. त्या वेळी ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. त्यात काही सैनिकांचाही समावेश होता, असे म्हटले गेले होते. याच दरम्यान, क्वेटा आणि मस्तुंग या परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला असून, ते सर्व हल्ले सुरक्षा दलांनी हाणून पाडल्याचे सरकारने जाहीर केले आहे.