भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव अधिक तीव्र झाला असून, सीमेलगत आणि देशांतर्गत सुरक्षेचा धोका वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सुरू असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री 26 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र भारतीय वायुदलाच्या सतर्कतेमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ‘फतेह-2’ नावाचं क्षेपणास्त्र दिल्लीच्या दिशेने डागलं होतं. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं प्रसंगावधान राखत हे मिसाईल सिरसा (हरियाणा) परिसरात हवेतच निष्क्रीय केलं.
याप्रसंगानंतर भारताने तत्काळ प्रत्युत्तर दिलं असून, पाकिस्तानच्या तिन्ही महत्त्वाच्या हवाई तळांवर लक्ष्य करत जोरदार हल्ला केला असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाक सैन्याने ‘बुनियान उल मर्सूस’ नावाचे ऑपरेशन राबवायला सुरुवात केली आहे.
दिल्लीसह जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या असून, देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव दिल्ली विमानतळावरील 138उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तणावपूर्ण वातावरणात सरकार आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण तयारीत आहेत. नागरिकांनी शांतता राखावी आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.